वाडी मंदीर अमळनेर

अमळनेरला वाडी चौक प्रसिद्ध आहे. चौकात गेल्यावर पूर्व दिशेला वाडी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याला शिखर नाही. पश्चिम मुखी असलेल्या रस्त्यावरील दरवाज्यातून चार-पाच पायर्‍या उतरून आत गेल्यावर एक चौक लागतो. पूर्वी याला दगडी चौक म्हणत असत आता दत्तमंदिर चौक म्हणतात. या चौकांतील सर्व भितींवर पूर्वी देवदेवतांची चित्रे होती परंतु आता टाईल्स ( ग्रेनाइट बसवून) संपूर्ण चौकात संत सखाराम महाराज चरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची सचित्र अशी ओवी पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.​

देवघरात पायर्‍यांचे तीन टप्पे आहेत. त्यावर अनेक देव देवता विराजमान असतात. सर्वात वरच्या बाजूस एक खास कमान उभारली असून त्यात ‘श्री विठल-राई-रखुमाई’ गरुड व हनुमंत असे सहसा कुठे न पाहावयास मिळणारे ‘विठल पंचायतन’ उभे केले आहे. या मूर्तीच्या प्राणप्रतिष्टे वेळी संत सखाराम महाराजांनी जो रथोत्सव सुरू केला तोच आज 250 वर्ष अखंडितपणे साजरा केला जातो.​

या चौकातून उतराभिमुख दरवाज्यातून आत गेल्यावर एक सभा मंडप लागतो. तो खूप उंच आहे. त्याचा दोन्ही बाजूस भक्तांना बसण्यासाठी जागा आहे. सभामंडपात भजन, कीर्तन, प्रवचन, पोथी वाचन इ. कार्यक्रम होतात. सभागृहाच्या पश्चिमेला देवाचा गाभारा. आहे. त्यांतील नक्षीदार खांबांना लाठी टाकलेली आहे. मध्ये  थोडी मोकळी जागा सोडून मग देवघर उभारले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस जाळीदार नक्षीच्या लाकडी भिंती असून समोरच्या दर्शनी भागांत उत्तम नक्षीकाम केलेले तीन कमानी दरवाजे आहेत. देवघराचे बाहेरील दर्शनी बाजूस दशावताराची लाकडी चित्रे कोरलेली आहेत

विठल पंचयतनाखेरीज ज्या अनेक देव देवता आहेत त्यात एक अतिशय महत्वाची मूर्ति आहे ती म्हणजे ची ‘श्रीलालजी’ मूर्ति. चाळीसगाव मुकामी एका श्रीमंत महिलेकडे महाराजांचे कीर्तन प्रसंगी त्या बाईकडे असलेली देवघरांतील ही मूर्ति महाराजांसोबत नृत्य करू लागली. महाराजांची भावअवस्था लालजींना आवडल्याने त्यांनी महाराजांसोबत राहण्याचा निर्णय घेऊन त्या बाईला स्वप्नात दृष्टांत देवून मला महाराजांना अर्पण कर असे संगितले. त्याप्रमाणे त्यांनी ती ‘लालजींची’ मूर्ति सखाराम महाराजांना अर्पण केली. श्री लालजींच्या मूर्तिचा डावा हात डाव्या खांद्याजवळ तर उजवा हात उजव्या बाजूस कमरेजवळ आहे. एक पाय पुढे व एक मागे असा नृत्याचा भाव असलेली अत्यंत रेखीव अशी पंचधातूंची लालजींची मृतीच रथोत्सवात रथामध्ये तर पालखी उत्सवात पालखीत विराजमान असते.

मंदिरातील लाठीच्या आत एक समाधी व श्री विठल रुक्मिणीची मूर्ति आहे. देवाला नमस्कार करून प्रदक्षिणा करायला निघाले म्हणजे प्रथम एक समाधी लागते ती समाधी संत श्री सखाराम महाराजांचे गुरुबंधु श्री लक्ष्मीकांत महाराज यांची आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक खोली लागते. त्या खोलीला चित्राची खोली म्हणतात. सखाराम महाराजांच्या झोपडीच्या जागेवर ही खोली आहे. या खोलीत दगडी रथांत सखाराम महाराज यांच्या पादुका आहेत. या खोलीत आजही श्री सखाराम महाराज रात्रीसाठी विश्रांतीला येतात ही पूर्वापार भावना भाविकांच्या मनात अद्यापही तशीच आहे.

नूतनीकरण करताना विद्यमान गादीपती प.पू.प्रसाद महाराजांनी सर्व भिंतींना ग्रेनाईट बसवले असून तळाला टाईल्स बसवल्या आहेत. गाभारा मंदिराच्या समोर श्री सखाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या संगमरवर अशा सुंदर मूर्ति आहेत. त्याच्यापुढे पांडुरंगाकडे तोंड करून हनुमंत रायाची मूर्ति आहे. पुढे कपाटात ग्रंथ ठेवलेले असून त्यापुढे अन्नपूर्णा मातेची मूर्ति पाहावयास मिळते. चौकात प्रथम सखाराम महाराजांपासून दहावे सतपुरुष श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या फोटो प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.​

दत्तमंदिर चौकात भगवान दत्तात्रयांचे मंदिर, उजव्या सोडेंचा गणपती मंदिर व त्याच चौकातून विश्रांतीच्या खोलीतील श्री सखाराम महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेता येते. उत्तरेकडे असलेल्या पुढील चौकात हनुमंत व महादेवाचे छोटेखानी मंदिर असून त्यांच्या दर्शनानंतर उत्तरेकडील दरवाज्यातून मंदिराच्या बाहेर पडता येते. मंदिर परीसरात स्वयंपाकगृह, भोजनगृह, घोडे बांधण्याची पागा, कोठीघर, धर्मशाळा, गंगामाई मंदिर, अशा अनेक इमारत जुन्या पद्धतीचा होत्या. त्यात कालमान परत्वे बद्दल होत जाऊन आज अतिशय भव्य दिव्य असे नूतनीकरण पाहवयास मिळते.  ज्यात अतिशय आकर्षक असे रथासाठीचे स्थान भक्तांसाठी भक्तनिवास, सर्व सुविधायुक्त स्वयांपाक गृह, भोजन गृह, वेदपाठशाळा, वारकरी पाठशाळा, कार्यालय, दवाखाना, बालवाडी, ई. साठी स्वंतंत्र व्यवस्था पाहावयास मिळते. ​

या खेरीज पंढपूर, पैठण, आळंदी, येथे असलेले संस्थान मालकीचे मठ शिवाय पेशवे कालीन देवस्थानला मिळालेल्या अनेक गावांतील ईनामी जमीनी या सर्वाचे मिळून आजचे ‘श्री सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थान अमळनेर – पंढरपूर‘ निर्माण झाले आहे.​