श्री प्रसाद महाराज

श्री प्रसाद महाराज यांनी श्री सखाराम महाराज यांच्या गादीचे अत्यंत खडतर आचारधर्म असलेली धुरा ज्यावेळी आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळी त्यांचे वय फक्त २९ वर्षे. जीवनातील अनेक लोकांना बळी पडणाऱ्या ऐन तारुण्याच्या बहारात त्यांनी ब्रह्मचर्य पालन, संन्यस्तवृत्ती असे विरक्त जीवन स्वीकारले. तेही प्रसाद महाराज यांना लोभस व्यक्तिमत्व व राजबिंडे स्वरुप लाभले असतांना! असा निग्रह करणे हे केवळ असामान्यत्वाचेच लक्षण आहे.

श्री प्रसाद महाराजांच्या या कालावधीत त्यांनी पूर्वपरंपरेनुसार चालत आलले सर्व नियम धर्म उत्तम प्रकारे सांभाळले आहेच, त्या बरोबरच नवीन काळानुसार त्यात जे काही नवे उपक्रम त्यांनी सुरु केले आहेत. त्यातून त्यांचा दूरदर्शीपणा दिसून येतो.

श्री बाळकृष्ण महाराज (आंधळे महाराज) यांचा अपवाद सोडल्यास अन्य कोणीही महाराज कोल्हापूरला गेले नव्हते. वर्षभराचे ३६५ पैकी ३५ दिवसाचे अमळनेर येथील व १२० दिवसाचे (चातुर्मास) पंढरपूर येथील वास्तव्य सोडून उर्वरित २१०

दिवसांच्या तिथी नुसार मुक्कामासहित गेल्या २०० वर्षापासूनच्या कधी ही खंड वा बदल न होणार्‍या व्यस्त कार्यक्रमात सुद्धा वेळातवेळ काढून प.पू. श्री प्रसाद महाराज यांनी कोल्हापूरची अंबाबाई, मिरज, सांगली, बार्शी (भागवत दर्शन), तुळजापूर (भवानीमाता दर्शन) , अक्कलकोट (स्वामीसमर्थ दर्शन), गाणगापूर (दत्त दर्शन), नरसोबावाडी (दत्तदर्शन). सोलापूर (सिद्धराम दर्शन), असे पंढरपूरच्या जवळपास असलेल्या सर्व तीर्थस्थानांना त्यांनी प्रतिवर्षी जाण्याचे ठरवून त्या विभागातील लोकांना श्री सखाराम महाराज यांच्या गादीचा परिचय करुन दिला. पैठणला मुक्काम असतांना श्री ज्ञानेश्वर महाराज औरंगाबादला जाऊन येत होते. महाराजांनी तेथे मुक्काम करण्यास सुरुवात केली. पुणे येथे ही एक ऐवजी दीड दिवस मुक्काम करण्यास सुरुवात केली. अधिक महिन्यात मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी अशा नवीन भागात फिरस्ती केली. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या नव्या विस्तृत क्षेत्रात श्री सखाराम महाराजांचे नाव झाले.

पंढरपूर येथील चार महिने मुक्कामात होणाऱ्या खर्चासाठी त्यांनी कायम स्वरुपी ठेव स्वीकारुन येणाऱ्या व्याजातून तो दिवस त्या दात्याचा असे ठरवून भोजन प्रसादाची एक नवी योजना तयार केली व दोन तीन वर्षातच १०० पेक्षा जास्त देणगीदार होऊन ती योजना यशस्वी झाली.

अमळनेर व पंढरपूर येथील मठ, तसेच पैठण, आळंदी येथील मठ या सर्वांचा जीर्णोध्दार करणे, त्यात नाविन्यपूर्ण सुधारणा करणे, आधुनिक सुखसोयींनी युक्त असे बांधकाम करणे व त्यातून संस्थानचे उत्पन्नात वाढ होऊन अजून काही नव्या सुधारणा करण्याचा त्यांचा मानस आहे.

अमळनेर व पंढरपूर येथे जे महाराज वैकुंठवासी झाले त्यापैकी फक्त ५ महाराजांच्या समाध्या बांधल्या आहेत. परंतु अजूनं पाच महाराजांच्या समाध्या बांधावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांनी “ समाधी जीर्णोध्दार निधी” योजना सुरु केली आहे. त्यालाही उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.

संस्थानच्या मालकीची दान मिळालेली अनेक एकर शेती आहे. त्या सर्व जमीनींची मा. धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून परवानगी घेऊन विक्री करावयाची व त्यातून मिळणाऱ्या पैश्यातून मोफत रुग्णालय, विद्यासंकुल, इत्यादी उपक्रम सुरु करण्याचा त्यांचा संकल्प आहे व त्यादृष्टींनी त्यांची वाटचाल सुरु आहे. श्री प्रसाद महाराज यांचे काळात फिरस्तीच्या वेळी झालेल्या वाढत्या उत्पन्नातून त्यांनी संस्थानच्या विकासाच्या दृष्टीने काही कामे केली आहेत व पुढेही करण्याच्या त्यांच्या योजना आहेत. 

श्री प्रसाद महाराजांनी बदललेल्या कालमान आणि विचारसरणीनुसार परंपरेला कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही याकडे पूर्ण लक्ष देऊन काही नवीन उपक्रम सुरु केले आहेत. त्यामध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायण टाळ मृदुंगाच्या साथीत श्री तुकारामांच्या गाथ्याचे पारायण गाथा अभंग गान सप्ताहश्री दासबोधाचे पारायण 

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भजन, प्रवचन, कीर्तन इत्यादी कार्यक्रमांबरोबरच गायनाचा कार्यक्रम. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीला सुविख्यात गायक पं. भिमसेन जोशी यांचा “संतवाणीचा” कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा पासून परवाच्या १० व्या पुण्यतिथीपर्यंत दरवर्षी पुण्यतिथी दिवशी अनेक नामांकीत गायक गायीकांचे कार्यक्रम आयोजित केले गेले. आश्विन महिन्यात व।। दशमी, एकादशी, द्वादशी असे तीन दिवस, श्री विठ्ठल मंदिरात देवा समोरच्या मोठ्या सभामंडपात भजनी नामजपाचा कार्यक्रम सुरु केला.

पंढरपूर मधील बहुतेक सर्व महाराज, फडकरी, देवांचे सेवाधारी, वारकरी, नागरीकमोठ्या उत्साहात सहभागी होतात. टाळ मृदंगाच्या साथीवर सर्व जण मोठ्या आनंदात, नाचत खेळत राम-कृष्ण-हरी या नाममंत्रांचे भजन सुमारे दोन तास करीत असतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव या भजनाच्या वेळेस येतो शेकडो वैष्णव टाळ, मृदंग, पताका घेऊन रिंगण करत मोठ्या प्रेमाने, आनंदात भजन करतात त्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भावाप्रमाणे एक अलौकिक समाधान प्राप्त होते असा अनुभव आहे. अशा पद्धतीने नियमित स्वरुपात भजनी नामजपाचा सोहळा श्री प्रसाद महाराजांनी सुरु केला आहे.