
श्री सखाराम महाराज यांचे गादीवरील हे तिसरे पुरुष. मुळचे राहणारे वर्हांड मधील मलकापूरचे. बाळकृष्ण देशपांडे हे त्यांचे नाव ते खूप वैराग्य संपन्न होते. पैशाला तुच्छ लेखीत असत. गृहस्थाश्रमी धर्माचा वीट आल्यावर अमळनेरी आले व श्री गोविंद महाराजांबरोबर राहू लागले. महाराजपणाची माळ गळ्यात पडल्यावर सदगुरूंनी घालून दिलेली परंपरा उत्तम प्रकारे सांभाळली. कोणाचीही भीड त्यांनी ठेवली नाही.
एकदा पंढरपूरला चार महिन्याच्या वास्तव्यासाठी महाराज आले असता महाद्वार येथील मठात, मठाच्या पावित्र्याला विसंगत कार्यक्रम झाल्याचे महाराजांच्या कानावर आले. घडलेली घटना महाराजांना उचित न वाटल्याने त्यांनी बडव्यांना (गोविंद तुकाराम बडवे यांचे पुर्वज) बोलावले आणि हातावर पाणी सोडून तो मठ त्यांना दान दिला. फक्त देवाच्या मूर्ति व वीणा घेऊन महाराज बाहेर पडले.
असेच एकदा बडोद्याला गेले असतांना द्रव्याच्या राशीच्या राशी येऊ लागल्या, व महाराजांनी मुठी भरभरुन ब्राह्मणांना दक्षिणा वाटली. त्याकाळात बारा हजार रुपये दक्षिणे प्रीत्यर्थ वाटल्याचे हिशोबात दिसून आले. पैशाला तृणवत् मानण्याच्या या त्यांच्या स्वभावामुळे संस्थानला थोडे कर्जझाले. पण त्याबाबत त्यांना सांगण्याचे धाडस कोण करणार? पण अखेरीस श्री. सिताराम बुवा धरणगावकर यांनी श्री बाळकृष्ण महाराजांना याबाबत सर्व सांगितले असता त्यांनी सर्व पैशाचा कारभार श्री सिताराम बुवांकडे सोपवून आपण अलिप्त राहिले. –
इ.स. १८६५ च्या सुमारास महाराज खूपच आजारी पडले. त्यावेळी अमळनेरचे सुप्रसिध्द वैद्य, अण्णावैद्य यांनी त्यांना बरे केले असता महाराजांनी खूष होऊन त्यांना पाषाणाची गणेशमूर्ति, भरपूर दक्षिणा व एक वाडा देऊन टाकला. इ.स.१८६८ च्या सुमारास महाराजांच्या प्रकृतीची पुन्हा तक्रार सुरु झाली. त्यावेळी त्यांनी श्री प्रल्हाद महाराजांना गादीवर बसविले. दोन वर्षे त्यांचे बरोबर राहून सर्व व्यवस्था नीट दाखवून मग ते निवृत्त झाले.
इ.स. १८७६ मध्ये मुल्हेर येथे मोठा यज्ञ झाला त्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आल्यावरून महाराज तेथे गेले. ब्राम्हणांना मोठ्या प्रमाणात दक्षिणा देऊन तृप्त केले. तेथून परत येत असतांना धुळे येथे त्यांना खूप ताप आला म्हणून अमळनेर येथे आणले. वाडीत देवासमोर बसविले असता तेथेच त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. इ.स. १८५१ ते इ.स.१८६८ ह्या १७ वर्षाच्या कारकिर्दीमधील आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी आपले गुरु श्री गोविंद महाराज यांचे समाधीचे बांधकामास पंढरपूर येथे सुरुवात केली.







