जीवनपट : संत सखाराम महाराज

दैदिप्यमान असा वारसा लाभलेल्या या संस्थांनचे प्रथम व मूळ सत पुरुष

 “श्री सखाराम महाराज” यांचे चरित्र म्हणजे, विरक्ती व भक्ती यांचा उत्कृष्ट संगमच म्हंटला पाहिजे.

महाराजांचा जीवनपट इ. स. १७५७ ते १८१८ –

            अमळनेरपासुन जवळच पिंपळी नांवाचे गांव. ईश्‍वरनिष्‍ठा, धर्माचरण व व्रत वैकल्‍याचे आचरणसह रामभटाचा रहिवास. सिताबाई नावाची सह धर्मचारिणी पत्‍नी. पोटी संतान नसल्‍याची खंत म्‍हणून दुसरा विवाह केला. नानुबाई हे दुसऱ्या पत्‍नीचे नांव. दोन्‍हीसह सुखाचा प्रपंच. परंतु पुत्र रत्‍न नसल्‍याचे शैल्‍य. रामभटांचे देवाला साकडे. सिताबाईला स्‍वप्‍नांत साक्षात्‍कार. तुझ्या पोटी ईश्‍वरनिष्‍ठ किर्तीमान पुत्र जन्‍माला येईल असे वरदान. स्‍वप्‍न दृष्‍टांताचा सिताबाईस अत्‍यानंद.

            ईश्‍वरी संकेताची प्रचिती. सिताबाईस गर्भधारणा रामभटांना आनंद डोहाळे विचारणे, पुरवणे, नवमास कालावधी पूर्ण. ईश्‍वरनाम सवंत्‍सर शके १६७९ मार्गशिर्ष शु.७ शततारका नक्षत्र इ. स. १७५७ रामभटांना व सिताबाईस पुत्र रत्‍नाची प्राप्‍ती पिंपळी गावांत आनंदोत्‍सव, देवादिकांचे, ऋषीमुनींचे बाळास आशिर्वाद. जातभादी कर्मविधी संपन्‍न.

            रामभटांकडुन, जातककर्म, शांतीपाठ, जन्‍मकुंडली व भविष्‍य वर्णन. सखाराम हे नामाभिदान नानुबाईस मात्र विषाद, दिवसागणिक सखारामाची वाढ, आई बापाकडुन कौतुक. वय वर्ष ४ पुर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या शंका विचारुन त्‍याचे रामभटांकडुन निरसन करुन घेणे. काळाचा महिमा सिताबाईचा स्‍वर्गवास मातृवियोगाचे दुःख. हे विसरुन सवंगड्यासोबत खेळ, देवाचे भजन, किर्तन, एकांतवास भौत्‍तीक सुखाची अनासक्‍ती, बालपणापासुनच विरक्‍ती, वैराग्‍याची आवड यासह काळ लोटला. वय वर्ष ८ पुर्ण झाले. रामभटांकडुन व्रतबंधाची तयारी.

            मास, तिथी, नक्षत्र आणि मुहर्त याचा उत्‍तम मेळ घालुन तारणनाम संवत्‍सर शुभमास शुभतिथी व शुभ मुहर्तावर विद्वान  ब्रह्म वृन्‍दाकडुन सखारामाचे मौजीबंधन झाले. त्‍याचवेळी व्रतस्‍थ जीवन सद्गुरु सेवा, ब्रह्मचर्य पालन, सुखोपभोगाचा त्‍याग इ. विषयी उपदेश. रामभटांना कृतार्तथा. चौथ्‍या आश्रमाचा विचार. सन्‍यांस दिक्षा घेतली रामभटांनी प्रपंच सोडला. सखाराम ९ वर्षाचा झाला. रामभट व्‍याधीग्रस्‍त. रामभटाचा अंत झाला. सखाराम पोरका झाला. सखारामचा चुलतभाऊ रंगनाथ याने नानुबाईसह सखरामाला विद्याभ्‍यासाठी अमळनेर येथे येण्‍याचा प्रस्‍ताव. अंमलबजावणी. रंगनाथने विद्याभ्‍यासासाठी अमळनेरकर तात्‍यापंतोजीकडे रवानगी केली. आठवड्याला पसभर धान्‍य (फसकी) आणि दोन संन्‍या (३ ढबू) मोबदला द्यायचा. सोबत घरांतली सर्व प्रकारची कामे करायची अट होती.

            तात्‍यापंतोजींना सखारामाच्‍या सहवासाने तो एक ईश्‍वरी संकेत असल्‍याचे जाणवले होते आणि म्‍हणुन निरोप देतांना ते म्‍हणाले-

मुल म्‍हणतां नयेचि तुजसी । भुल पडली असे जगासी ।महायोगी तूं जन्‍मलासी । साक्ष आली मजलागी ।अ.८/११७

श्रीधरपंतानी सखारामास याज्ञीकी शिकण्‍यासाठी सर्वगुणसंपन्‍न अशा पाठक गुरुजींकडे सोपवले. त्‍यांनी सखारामास चारवेद, उपनिषदे, सुत्र, भाष्य, हव्‍यकव्‍य, मंत्र, ऋचा, शोडस संस्‍कार इ. विषयी संपुर्ण याज्ञीकीचे शिक्षण दिले. सोबत वर्णाश्रम पध्‍दती, ब्राह्मणांनी वेदोक्‍त कार्यांत केलेली घालमेल याविषयीही समजावून सांगीतले. अशा पध्‍दतीने सखाराम वैदीकी ज्ञान साधना पूर्ण करीत होता. चोपड्यातील मुरारी भटांची कन्‍या गंगूबाई हिच्‍याशी सखारामाचा विवाह करावा असा विचार श्रीधरपंताच्‍या मनांत आला आणि त्‍यांनी सरळ मुरारीभटांकडे सखारामासाठीं कन्‍या गंगूबाईची मागणी केली. श्रीधरपंत व मुरारीभट यांनी मास। तिथी । नक्षत्र । व मुहर्त याचा मेळ घालून सखाराम व गंगुबाई यांचा शुभ विवाहासाठी विजयनाम वंवत्‍सर शके १६९५ वैशाख वद्य ५ हा मुहर्त निश्चित केला. इ.स. १७७३ (सखारामाचे वय वर्ष १६) विवाहाची तयारी सुरु झाली. इकडे भक्‍तवत्‍सल पांडुरंगाने रुक्मिणीसह सखारामाच्‍या विवाह प्रसंगी हजर राहण्‍यासाठी भूवैकुंठ पंढरीनिवासी विठ्ठलपंत नावांने रामभटांचे जुने स्नेही म्‍हणून त्‍यांच्‍या निधनाच्‍या निमित्‍ताने भेट घेण्‍याचे कारण सांगुन चोपडा गाठले. ठरवलेल्‍या लग्‍न मुहुर्तावर सर्व प्रकारचे लग्‍नविधी यथोचितपणे संपन्‍न होऊन  सखारामाचा विवाह सोहळा अतिशय आनंदात पार पडला. भगवान पांडुरंग (विठ्ठलपंत) रुक्मिणीसह परत जाण्‍यासाठी श्रीधर पंताजवळ निरोप मागतात. परंतु श्रीधरपंताच्‍या आग्रहास्‍तव एक दिवस राहुन सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला. अध्‍यात्मिक चर्चा केली. दुसऱ्या दिवशी सर्वांनी मुरारीभटांकडे जाण्‍याची परवानगी मागीतली. तेंव्‍हा मुररीभटांच्‍या पत्‍नीने नमस्‍कार करुन देवी रुक्मिणीची ओटी भरली.व गंगूसहित जामात पदरी घातल्‍याचे विनवले. त्‍या भावविवश प्रसंगी प्रत्‍यक्ष भगवान सखारामास म्‍हणाले-

तरी सखारामा ऐवढे करी । धरावी पंढरीची वारी ।

येवूनिया आमुचे मंदिरी । भेटी आम्‍हां देईजे ।

तुज होईल सद्गुरुजी भेटी । तुटेल जन्‍माची आटाआटी ।

ऐसे वदुनि जगजेठी । मस्‍तकी हात ठेविला ।

उपदेश ऐकूण सखारामाने साश्रुं नयनांनी उभयतांनी नमस्‍कार केला.

 

भगवंताच्‍या उपदेशाचा सखारामाच्‍या मनावर परिणाम झाला. त्‍याच्‍या विवाहसोहळ्याची लोकमानसांत चर्चा होत असली तरी तो स्‍वतः मात्र अस्‍वस्‍थ झाला होता. भजन, नामस्‍मरण, अखंड चिंतन या पध्‍दतीने ६ वर्षाचा काळ निघुन गेला. सखाराम आतां २२ वर्षाचा झाला होता. रंगना‍थने सखारामाला भिक्षुकीस लावले. परंतु विरक्‍त मनाच्‍या सखारामाला लोभीपणा अंगात नसल्‍याने भिक्षुकीतून आर्थीक प्राप्‍ती होत नव्‍हती. एक दिवस पुजेला बसलेला असतांना दारावर हांक ऐकू आली. विलंब झाल्‍याने एरंडोल नगरीचे वैराग्‍यमूर्ती रघुनाथस्‍वामीहे पुढे निघुन गेले. त्‍यांच्‍या पाठीमागुन जातजात सखाराम एरंडोल येथे पोहचला. स्‍वामींचे दर्शन झाले. दृष्‍ठादृष्‍ट झाली. आणि खऱ्या अर्थानं सखारामाच्‍या जीवनाला कलाटणी मिळाली. 

तुकाराम महाराजांच्या भाषेत विरक्ती

भक्त ऐसे जाणा | जे देही उदास | गेले आशापाश || निवारोनी.

अधिकार इतका मोठा की प्रत्यक्ष भगवान चरित्र पुरुषाच्या आयुष्यात एकदा दोनदा नाही तर चारदा प्रत्यक्ष सहभागी झाला.

(संत सखाराम महाराज चरित्र लीलामृतामधील अध्यायानुसार घडलेले प्रसंग)

१. सखाराम महाराजांच्या लग्न सोहळ्यात भूवैकुंठवासी विठ्ठलपंत रूपाने . (अध्याय क्रं. ११)

२. नामसप्ताह प्रसंगी तुका, नामा, रुख्मिणी, अन्नपूर्णा, गुरुड यांसह पंढरीनाथ नावाने हजेरी. (अध्याय क्रं. २३,२४)

३. पालखीनस्त महतांची १ हजार शिष्यांना भोजन इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठलशेठ (लाडवाणी)नावाने लाज राखली. (अध्याय क्रं.२८)

४. भजन समई मुर्छा आलेली असता स्व: हस्ते पंढरपूर येथे दक्षिणद्वारी दहिपीठ खाऊ घातले. (अध्याय क्रं. २७)

चमत्कार

या संताच्या जीवनातील चमत्कारही तितकेच डोळे दिपवणारे आहेत.
१. कीर्तन समई भला मोठा नाग फुत्कार टाकीत येणे, कीर्तन संपेपर्यंत डोलत राहणे व नंतर प्रदीक्षणा करून निघून जाणे. (अध्याय क्रं. २७)
२. मूर्च्छा आलेल्या सखारामास त्वरित भोजन देण्यासाठी कान्होजी बडव्याच्या स्वंप्नात चाबकाचे फटकारे देऊन साक्षात्कार देणे. (अध्याय क्रं. २७)
३. पंढरपूर वारीत कायगाव येथे गोदावरीला महापूरात उडी टाकून पैलतीराला जातांना वाट करून देणे. (अध्याय क्रं. २८)
४. चाळीसगाव येथे महाराजांचे कीर्तनात लालजींच्या मूर्तिने नृत्य करणे. (अध्याय क्रं. २९)
५. मान्याभिलांची लुटारी वृती पालटून अविरत सेवा करण्याची इच्छा प्रगट करणे इ. (अध्याय क्रं. ३२)
अशा अधिकारी सतपुरुष श्री सखाराम महाराज यांचा जीवनपट असा आहे.

जन्म : ईश्वरनाम सवंत्सर
शके १६७९ मार्गशीष शु || सप्तमी शततारका नक्षत्र इ.स. १७५७.

गाव : पिंपळी ता. अमळनेर जि. जळगाव

वडील : वडील- वेदमूर्ति रामभट थिटे

आई : सीताबाई , सावत्र आई नानूबाई.

जन्मनाव : सखाराम

मातृवियोग: वयाच्या ४ थ्या वर्षी ( सावत्र आई कडून सांभाळ )

उपनयन संस्कार : तारण नाम सवंत्सर शुभदीन
शुभमुहर्तावर वयाच्या ८ व्या वर्षी. इसवी.सन १७६५

पितृवियोग : रामभटांचा चौथ्या
आश्रमाचा विचार संन्यास दिक्षा घेतली प्रपंच सोडला.

पुढे व्याधीग्रस्त सखारामास उपदेश
प्रकृती बिघडली व त्यातच अंत.

शिक्षण : रामभटांच्या अंतानंतर चुलतबंधू रंगनाथ

याने सखारामास शिक्षणाच्या दृष्टीने गुरूंकडे सोपविले.

व्यावहारीक शिक्षण : तात्या पंतोजी

याज्ञकी शिक्षण : पाठक गुरुजी

विवाह : वयाच्या १६ व्या वर्षी सखाराम महाराजांचा

श्री मुरारी भटांची कन्या गंगाबाई हिच्याशी विवाह झाला.

विजय नाम सवंत्सर शके १६९५ वैशाख वद्य || पंचमी

इ.स. १७७३ विवाह समयी पांडुरंगाचा सखारामास उपदेश.

प्रापंचिक विरक्तीचा काळ

प्रपंचात रस नाही, पंढरपूर वारीस जाण्याची तीव्र इच्छा चुलतभावाचा विरोध, रघुनाथ स्वामींची भेट, पूर्वजन्माचा वृतांत कथन, श्री निवास स्वामींना सदगुरु करण्याचा आदेश श्री निवास स्वामींचा सदगुरु उपदेश, प्रथम पंढरपूर वारी इ.स. १७८० अल्पकाळ प्रपंच, पुत्रप्राप्ती व वर्षभरातच पुत्रनिधन, पुत्रनिधनाचा शोक न करण्याचा पत्नीस उपदेश व त्यानंतर लगेचच पत्नी गंगुबाईचा स्वर्गवास अंदाजे शके १७०३ इ.स.१७८१ व पुढे लहान वयातच विरक्ती. पुढे प्रतिवर्ष पंढरपूरवारी.​

देवता स्थापन करण्याचा निर्णय​

मूर्ति प्राण प्रतिष्ठा सोहळा ईश्वरनाम सवंत्सर शके १७३९ वैशाख शु|| १४ इ.स. १८१७ सोहळा पार पडला

शेवटची वारी : इ.स. १८१८ मध्ये महाराजांनी शेवटची पंढरपूर वारी केली. वारीहून परत आल्यावर आपले सदगुरु श्रीनिवास महाराज यांची भेट घेतली त्यांनी हे व्रत पुढे अखंडित चालवा असा उपदेश केला. उत्सवाची सुरुवात झाली. सर्वांचे भोजन झाले गोविंद केसकरांना उत्तराधिकारी नेमून महाराजांनी आपले अवतार कार्य संपवले. ( ६१ व्या वर्षी )

बहुधान्यनाम सवंत्सर शके १७४० इ.स १८१८ वैशाख शु || १४ ला श्री सखाराम महाराजांनी आपले अवतार कार्य संपविले.

असा अद्वितीय आहे या योगी सत्पुरुषाचा जीवनपट. एवढ्या संक्षिप्त जीवनपटावरून या योगपुरुषाची महती कळणार नाही त्यासाठी आतापर्यंत सानेगुरूजीनी सखाराम महाराजांवर अभ्यासपूर्ण चरित्र लिहिले आहे तसेच प्रामुख्याने “सखाराम महाराज चरित्र लीलामृत” या ग्रंथाचे वाचन करावे लागेल. तरच कळतील

सदगुरु सखाराम महाराज अमळनेर यांची संत परंपरा

सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थान अमळनेर-पंढरपूर या संस्थांनची जवळपास गेल्या २५० वर्षांची संत परंपरा देखील तितकीच भव्य आणि दिव्य राहिली आहे. प्रथम व मूळ सतपुरुष संत सखाराम महाराजांनंतर गादीवर आलेल्या सर्व संत पुरुषांनी गादी परंपरेची सुचिता – पवित्रता – आचरणशीलता तंतोतंत सांभाळली आहे. वारकरी, रामानुज, बैराग या तीन सांप्रदायाची एकत्रित आचरणशीलता संपूर्ण भारतात केवळ अमळनेर संस्थान मध्येच असावी असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. वारकरी, रामानुज, बैराग या तीन सांप्रदायाचे आचार-विचार- आचरण या दिव्य आणि कठोर नियमांचे पालन आज तागायत अव्याहत सुरू असल्याने या गादीवरील सत पुरुषाविषयी जनसामान्यात एक वेगळेच आदराचे व श्रद्धेचे स्थान आढळून येते. इ.स. १७८० पासून आजपर्यंतची गादीवरील सत पुरुषाची संत परंपरा या प्रमाणे पाहावयास मिळते.​

क्र.

         सतपुरुषाचे नाव

 

1

ह.भ.प. संत सखाराम महाराज

मुळ सतपुरुष

१७८० – १८१८ = ३८ वर्ष

2

 ह.भ.प. संत गोविंद महाराज

द्वितीय सतपुरुष

१८१८ –१८५१ = ३३ वर्ष

3

ह.भ.प. संत बाळकृष्ण महाराज

तृतीय सतपुरुष

१८५१ – १८७५ = २४ वर्ष

4

ह.भ.प. संत प्रल्हाद महाराज

चतुर्थ सतपुरुष

१८७५ – १८८५ = १० वर्ष

5

ह.भ.प. संत तुकाराम महाराज

पाचवे सतपुरुष

१८८५ – १८९६ = ११ वर्ष

6

ह.भ.प. संत कृष्णा महाराज

सहावे सतपुरुष

१८९६ – १८९७ = ०१ वर्ष

7

ह.भ.प. संत बाळकृष्ण महाराज (आंधळे)

सातवे सतपुरुष

१८९७ – १९३० = ३३ वर्ष

8

ह.भ.प. संत वासुदेव महाराज

आठवे सतपुरुष

१९३० – १९५२ = २२ वर्ष

9

 ह.भ.प. संत पुरुषोत्तम महाराज

नववे सतपुरुष

१९५२ – १९६४ = १२ वर्ष

10

ह.भ.प. संत ज्ञांनेश्वर महाराज

दहावे सतपुरुष

१९६४ – १९८७ = २३ वर्ष

11

ह.भ.प. संत श्री. प्रसाद महाराज (विद्यमान गादीपती)

अकरावे संतपुरुष

२३ जुलै १९८७ पासून

अशा ओजस्वि, तेजस्वी, तपस्वी, संत पुरुषाची संत परंपरा या गादीला लाभत आलेली असल्याने या संस्थांनचा अध्यात्मिक क्षेत्रातील व वारकरी साप्रदायांत एक आगळा वेगळा आदरयुक्त दबदबा सपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे.​