

श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर (वाडी) मंदिर व सतपुरुषांचा समाधी मंदिरांचा दर्शनीय परिसर. अमळनेर ता.अमळनेर जि. जळगाव. महाराष्ट्र राज्य.
‘पंढरपूर हे संतांचे माहेर घर तर अमळनेर हे भाविकांचे प्रतिपंढरपूर’
बोरी नदीच्या पूर्व तिरावर वसलेले पैलाड व पश्चिम तिरावर असलेले अमळनेर. (अमल- म्हणजे मल नसलेले) पश्चिमेकडील भागातून बोरी नदी पात्रात दक्षिणेकडे उतरल्यानंतर दिसून येणार्या चार सत पुरुषाच्या समाध्या व उतरेकडे नजर टाकली तर दिसणारा दगडी पूल, त्याच्या पलीकडे भुसावळ सुरत मार्गाचा रेल्वेपूल हे सर्व पाहिले की क्षणभर पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात उभे असल्याचा भास होतो. कारण तेथे ही अगदी अशीच परिस्थिती पाहावयास मिळते. म्हणून लोक याला ‘प्रतिपंढरपूर‘ असे म्हणतात.
या बाबत आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते ते म्हणजे पांडुरंगाचे परम भक्त बेलापूरकर महाराज दर एकादशीला पंढरपूर वारी करीत असत. पांडुरंगाने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की तु मला दर एकादशीला भेटतो परंतु वैशाख शू.|| ला मात्र तुला माझ्या दर्शनापासून वंचित राहावे लागते कारण वैशाखातील शु|| एकादशीला मी माझ्या प्रिय भक्त सखारामाच्या भेटीला अमळनेरला जातो. त्यामुळे तू वैशाखातील या एकादशीला अमळनेर वारी कर म्हणजे आपली भेट होईल. या कारणाने बेलापूरकर महाराज वैशाखातील शु|| एकादशीला अमळनेर येथे असतात. त्यांचे आगमन पांडुरंगासह नवमीला होते. गावांबाहेर ते मुक्काम करतात व दशमीच्या दिवशी स्वत; विद्यमान गादीपती श्री प्रसाद महाराज गांव वेशीवरून त्यांना मिरवणुकीने वाडीमधील मंदिरात घेऊन येतात अशी ही परंपरा गेल्या 200 वर्षापासून सुरू आहे. बेलापूरकरांसोबत पंढरीचा पांडुरंग अमळनेर ला येतो म्हणूनही अमळनेरला ‘प्रतिपंढरपूर’ म्हणतात.
अश्या या प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेर शहराला ज्यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली त्या संत श्री सखाराम महाराजांचे आध्यात्मिक क्षेत्रातील स्थान अतिशय उच्च कोटीचे आहे. कारण बालवयात त्यांना व्यावहारिक शिक्षण देणारे त्यात्या पंतोजी यांना पहिला साक्षात्कार झाला आणि तो त्यांनी सखारामास बोलुन दाखवला.
मुल म्हणता नयेची तुजसी | भुल पडली असे जगासी ||
महायोगी तू जन्मलासी | साक्ष आली मजलागी ||
याचप्रमाणे पुढे रघुनाथ स्वामी नामक सिद्ध पुरुषाने सुद्धा याच पद्धतीने पुन्हा: त्यांना सावधान केले व ते म्हणाले
भक्ती योग पूर्वजन्मीचा | राहिला तो पूर्ण व्हावयाचा |
यास्तव जन्म मृत्यू लोकीचा | घ्यावा लागे आपणा ||
येवढेच न्हवे तर त्यांच्या विवाह प्रसंगी प्रत्यक्ष पंढरपूर निवासी पांडुरंगाने त्यांना निरोपाच्या वेळी स्वमुखाने संगितले.
तरी सखारामा एवढे करी | धरावी पंढरीची वारी |
येवूनीया आमुच्या मंदिरी | भेटी आम्हा देईजे ||
तुज होईल सदगुरु भेटी | तुटेल जन्माची आटाआटी
ऐसे वदुनि जगजेठी | मस्तकी हात ठेवीला ||
अश्या प्रकारचा आध्यात्मिक उच्चधिकार असलेल्या संत श्री सखाराम महाराजांच्या पावन चरित्रामुळे अमळनेरला “श्री क्षेत्र अमळनेर” म्हणून प्रसिद्धी मिळाली.